10.02.2012 / nerul

सुखाचेहि अपघात झाले जरासे…
मला भावनांनी चकवले जरासे…

थवे चांदण्यांचे धरेवर उतरले…
की तू पापण्यांना उचलले जरासे…

उभे पाहिले ते तुला की शिवाला…
स्पंदन अचानक हे चुकले जरासे…

तुझी वाट पाहत इथे सागरी मी…
किनारे अतागत सरकले जरासे…

‘अजी झोप झाली नसावी तयांची’–
अम्ही पण रवीला अरवले जरासे…

‘कुण्या का ऋतूची म्हणे वाट पाहे’…
जगी बावळ्यांनी हटकले जरासे…

कधी तोच श्रावण अचानक बरसला…
कधी फक्त अश्रूच पडले जरासे…

मलाही न वेळीच सारे उमगले…
नि प्रस्ताव तूही बदलले जरासे…!